निरा : प्रतिनिधी
समता नागरी सहकारी पतसंस्था हिला महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या वतीने सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेच्या दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भोर येथील निसर्गरम्य परिसरातील आर्यन रिव्हरवूड रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात हा गौरव प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या सातत्यपूर्ण आर्थिक प्रगतीची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. संस्थेच्या आर्थिक कामगिरीबाबत माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, संस्थेच्या मुख्यालयासह तीन शाखा असून संस्थेच्या ठेवी २७६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या असून कर्जवाटप १९६ कोटी रुपये आहे. संस्थेचा स्वतःचा निधी ४८ कोटी रुपये असून विशेष म्हणजे संस्थेचा एनपीए शून्य टक्के राखण्यात संस्थेला यश आले आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवहार आणि सभासदाभिमुख सेवा यामुळे संस्था सहकार क्षेत्रात आदर्श ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपाध्यक्ष उत्तम आगवणे यांच्या सहकार्याने संस्थेने विकासाची भक्कम वाटचाल सुरू ठेवली आहे. संचालक मंडळाचे अचूक नियोजन, दूरदृष्टीचे निर्णय आणि कर्मचाऱ्यांची तत्पर सेवा यामुळे संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे.
हा पुरस्कार सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी तसेच महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सहकार क्षेत्रातील इतर संस्थांसाठी समता पतसंस्था प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे मुख्य व्यवस्थापक युवराज फरांदे, व्यवस्थापक राहुल ढोले, वरिष्ठ अधिकारी विक्रम जमदाडे, गणेश चव्हाण व किरण रासकर उपस्थित होते. संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्मचारीवर्गाचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ देण्याचे ध्येय समोर ठेवून संस्था कार्यरत असून भविष्यात आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शक सेवा व विश्वासार्ह व्यवहार यांच्या बळावर संस्थेची प्रगती अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत मिळविलेला हा सन्मान ठेवीदार, सभासदांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास हेच मुख्य कारण आहे असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप फरांदे यांनी व्यक्त केले.

0 Comments